Ad will apear here
Next
‘संतूर-नायक’


नामवंत प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी ख्यातनाम संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्यासह ‘ओ. पी. नय्यर- क्या बात है इस जादूगर की’ हे कॉफी-टेबल बुक तयार केले. त्या वेळी त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या, तसेच अन्य काही अविस्मरणीय अनुभवांना पाकणीकर यांनी दिलेले हे शब्दरूप...
............
एका फोटोग्राफी क्लबमध्ये माझं भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रांवर आधारित प्रकाशचित्र सादरीकरण सुरू होतं. इतक्या साऱ्या रथी-महारथींची प्रकाशचित्रे पाहून एका श्रोत्यानं मला मध्येच प्रश्न विचारला- ‘तुम्ही आतापर्यंत जवळजवळ पाचशेहून अधिक कलावंतांचे फोटो काढलेत. यात फोटो काढण्यासाठी सर्वांत अवघड किंवा आव्हानात्मक कलाकार कोण?’ मी म्हणालो, ‘प्रश्न सोपा आहे; पण उत्तर अवघड’. तो परत आग्रहाने म्हणाला - ‘तरी पण?’ मग पुढच्याच क्षणी मी त्याला उत्तर दिले, की – ‘अवघड नाही पण नेहमीच फोटोसाठी आव्हानात्मक वाटलेले कलाकार म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा.’ त्याचा लगेच पुढचा प्रश्न - ‘का?’ ‘कारण ते दिसायला इतके देखणे आहेत, की दर वेळी नवीन प्रकाशयोजनेत कोणत्या कोनातून त्यांचा जास्त चांगला फोटो येऊ शकेल हे पाहताना माझा कस लागतो. त्या बरोबरीनेच त्यांचं देखणेपण एक वेळ मी प्रकाशचित्रात अचूक पकडू शकेन; पण वादनात एकाग्र झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावरील ते झळाळतं तेज मी माझ्या लेन्समधून कसं पकडू शकेन याचं आव्हान नेहमीच माझ्या मनात घोळत असतं.’

त्या श्रोत्याला हे उत्तर देताना माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी. कितीही माणसांच्या गर्दीत हा मनुष्य काही ‘वेगळा’ आहे सहज लक्षात येईल असे व्यक्तिमत्त्व. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी संतूर हे त्यांचे वाद्य बॉक्समधून बाहेर काढले आणि ते ट्यून करायला सुरुवात केली. त्यांची लांबसडक पण नाजूक बोटे त्या तारांवरून फिरताना जो नाद होत होता त्या नादानेही ती खोली भरून गेली होती. सर्व जण शांतचित्ताने ऐकत होते. मी त्यांना फोटो घेण्याविषयी विचारले. त्यांनी हसून होकार दिला. मी त्यांच्या काही भावमुद्रा कॅमेराबद्ध केल्या. त्या वेळी मला काय कल्पना होती, की मी पुढे प्रकाशित करणाऱ्या माझ्या एका ‘कॉफी-टेबल बुक’मध्ये या महान कलाकाराचा महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

सवाई गंधर्व महोत्सव, इतर कार्यक्रम व माझ्या थीम कॅलेंडर्सच्या निमित्ताने माझी हळूहळू शिवजींशी ओळख होत गेली. प्रत्येक भेटीत त्यांचं मोठेपण माझ्या मनावर जास्तच बिंबत गेलं. कोणत्याही कार्यक्रमापूर्वी आधीची त्यांची तयारी, साउंड टेस्टिंग, मैफलीमधली त्यांची एकाग्रता आणि मैफलीनंतरचे शिवजी हे सर्व अनुभवण्याची संधी गेल्या काही वर्षांत मला मिळाली.

संगीतकार ओ. पी. नय्यर यांची अनेक प्रकाशचित्रे टिपली होती. त्या प्रकाशचित्रांचा वापर करून एक ‘कॉफी-टेबल बुक’ करावे असा विचार मनात घोळत होता. नय्यर साहेबांच्या त्या प्रकाशचित्रांबरोबर त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचे शब्द व त्या गाण्यांचे रसग्रहण द्यावे असा विचार होता. त्या अनोख्या गाण्यांवर रसग्रहण करायला व्यक्तीही तशीच हवी. माझ्या मनात एकच नाव होते – पंडित शिवकुमार शर्मा. त्या वेळेसच माझा एक जुना मित्र व आजचा अत्यंत व्यग्र व लोकप्रिय तबलावादक विजय घाटे माझ्या ऑफिसवर आला. आमच्या गप्पा व त्याचे असलेले काम झाल्यावर मी त्याला या पुस्तकाबद्दल सांगून विचारले, की इतक्यात शिवजींची भेट होणार आहे का? त्याने लगेचच त्यांना फोन लावला. त्यांच्या पुढच्या मैफलीबद्दल बोलणे झाल्यावर त्यांना म्हणाला, – ‘माझा एक मित्र आहे सतीश पाकणीकर, त्याचं तुमच्याकडे काही काम आहे.’ शिवजी म्हणाले – ‘हाँ, मैं पहचानता हूँ उनको. उनके पास दीजिये फोन.’ विजयने फोन मला दिला. खरं तर त्यांच्याशी काय बोलायचं याची माझी काहीच तयारी नव्हती; पण मी माझी कल्पना त्यांना सांगितली आणि म्हणालो – ‘ ये जो गीत मैंने चुने है इन गीतों की सांगीतिक खूबियोंके बारे में अगर आप बात करेंगे तो बहुत अच्छा होगा.’ त्यांनी मला लगेच प्रतिप्रश्न केला – ‘लेकिन यह मैंने क्यूँ करना है?’ मी उत्तर दिले की – ‘ मेरे दिमाग में इस के चार कारन है. हमें यह मालूम है की आप और नय्यर साब बहुत ही करीबी दोस्त थे. दुसरी बात, आप ने उनके संगीत में काफी साल संतूर बजाया है, तिसरी बात, आप खुद एक नामी संगीतकार रह चुके है और चौथी और अहं बात यह है की आप क्लासिकल संगीत के जाने-माने कलाकार है और नय्यर साब तो बोलते थे की उन को क्लासिकल संगीत की कोई भी मालुमात नहीं. यह चार चिजें लेकर आप अगर कुछ रोशनी डालेंगे तो बेहतर होगा.’ माझं म्हणणं संपताच पलीकडून शिवजी म्हणाले- ‘ बहुत अच्छा. यह जरूर करेंगे.’

त्यांच्या त्या होकारानं मला आनंद तर झालाच; पण एका वेगळ्या जबाबदारीची जाणीवही. त्यांच्याबरोबर काम करायचे होते म्हणजे ते त्यांच्या दर्जाला साजेसेच व्हायला हवे. मी कामाला लागलो. मी निवडलेल्या गाण्यांची एक सीडी शिवजींना दिली. माझे फोटोंच्या एडिटिंगचे कामही पूर्ण होत आले; पण दरम्यानच्या काळात शिवजींना अजिबात फुरसत मिळाली नाही. सततचे कार्यक्रम आणि परदेश दौरे यातून त्यांना वेळ मिळेना. मला पुस्तक नय्यर साहेबांच्या जन्मदिनी म्हणजे १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करायचे होते. ती तारीख जवळ येत होती आणि बाकीचे सर्व काम राहिले होते. तारखेची ही मर्यादा लक्षात घेता मला हे कसे जमेल ते समजत नाही असा निरोप मला शिवजींकडून आला. मी त्यांना कळवले, की या १६ जानेवारीला नाही जमले तरी चालेल पुढच्या वर्षी करू; पण रसग्रहण मात्र तुम्हीच करा. माझा हट्ट कामी आला.

काही दिवसांनी शिवजींची मैफल पुण्यात होती. त्यांनी मला कळवले की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्या गाण्यांबद्दल बोलू. तो दिवस होता १७ मे २०१३. मी, माझा भाऊ हेमंत, मित्र धना गोखले व दिलीप काळे असे चौघे साडेतीनलाच हॉटेल मॅरिएटमध्ये पोहोचलो. मी माझ्या मोबाइलवर व एका रेकॉर्डरवर शिवजींचे कथन टेप करणार होतो. बरोबर चारला आमचा ‘साँग अॅप्रिसिएशन सेशन’ सुरू झाला. पेन ड्राइव्हवरील एक गाणे ऐकायचे आणि त्याच्यावर शिवजींनी बोलायचे असे ठरले. सुरुवातीलाच त्यांनी नय्यर साहेबांच्या काही आठवणी आम्हाला सांगितल्या. शिवजींची संतूरवरील हुकुमत जितकी लाजवाब आहे, तितकीच त्यांची एखादा प्रसंग किंवा आठवण खुलवून सांगण्याची हातोटी. त्यात पुन्हा त्यांची कमालीची विनोदबुद्धी. त्यामुळे मैफल जमायला काहीच मिनिटे पुरेशी होती.

‘हुजुरेवाला...’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगची आठवण सांगताना त्यांनी चुकून आशा भोसले यांच्या बरोबर कमल बारोट यांचं नाव घेतलं. खरं तर ते गाणं आशा भोसले आणि मिनू पुरुषोत्तम यांच्या आवाजात आहे. त्यांनी ती आठवण सांगून पूर्ण केली. मग आम्ही एकेक गाणं ऐकत रसग्रहण टेप करीत गेलो. चार वाजता सुरू झालेली ही मैफल छपन्न गाणी ऐकल्यानंतर पावणेनऊ वाजता संपली.

मी ते सगळे रेकॉर्डिंग ऐकत त्यातील शब्द अन शब्द लिहून काढला. आता त्याच्या ट्रान्सक्रिप्शनचे काम होते. तेही हिंदीतून. इथे माझ्या मदतीला सुलभाताई तेरणीकर आल्या. तो सर्व मजकूर तयार करून मी त्या पानांचे प्रिंट्स काढले. या सर्व तयारीत तीन महिने गेले होते. आता परत एकदा शिवजींना भेटायचे होते. त्यांची वेळ घेतली आणि त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या हातात ते प्रिंट्स दिले. समोरच्या सोफ्यावर बसत त्यांनी वाचायला सुरुवात केली. एक पान वाचून उलटले आणि पुढे वाचत एकदम म्हणाले – ‘ अरे, यह करेक्शन भी कर दी आपने.’ आम्ही कमल बारोट यांच्या नावाच्या ठिकाणी मिनू पुरुषोत्तम हे नाव लिहून टाकले होते; पण तीन महिन्यांनीसुद्धा आपल्या तोंडून चुकून झालेली चूक शिवजींच्या लक्षात होती. त्यांच्या मेमरीला दाद द्यायची, का त्यांच्या कामाविषयीच्या आत्मीयतेला, या प्रश्नात आम्ही बुडून गेलो.

१६ जानेवारी २०१४ रोजी ‘ओ. पी. नय्यर- क्या बात है इस जादूगर की’ या मी व पंडित शिवकुमार शर्मा यांनी एकत्रितपणे केलेल्या कॉफी-टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते पुण्यात झाले. तो गुरुवार होता. म्हणजे वर्किंग डे. कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता. त्यात टिळक स्मारक मंदिरात पार्किंगला जागा अपुरी. त्यामुळे मला किती प्रेक्षक येतील त्याविषयी काळजीच होती. ती काळजी व दडपण नक्कीच माझ्या चेहऱ्यावर दिसत असणार. शिवजींनी मला विचारले – ‘सतीश, आप कुछ परेशान लग रहे है. क्या बात है?’ मी माझी काळजी त्यांना सांगितल्यावर मला आश्वस्त करीत ते म्हणाले – ‘अरे, इस की चिंता मत करो. अगर पचास भी लोग है तो हम ठीक छे बजे प्रोग्राम शुरू करेंगे. जो लोग आए है उनके लिये’. मी परत एकदा निश्चिंत झालो. फक्त त्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले. त्यांच्या निवेदनाच्या खास शैलीत परत त्यांनी नय्यर साहेबांच्या काही आठवणी सांगत रसिकांना लुब्ध केले. त्यांच्याइतका मोठा कलाकार माझ्या विनंतीला होकार देत एवढे सहकार्य करतो ही गोष्ट आजच्या जमान्यात विश्वास बसणार नाही अशी आहे; पण त्यावर अनुभवाने व आनंदाने मला विश्वास ठेवावाच लागतोय.

‘भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्याही पलीकडे आहे. अध्यात्म आणि भारतीय शास्त्रीय संगीत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताची उत्पत्ती आपल्या देशाच्या आध्यात्मिक परंपरेत होती. आध्यात्मिक आनंद निर्माण करणारे आणि श्रोत्यांना त्यात सामावून घेणारे संगीत हे आजही या कलाप्रकाराचे सार आहे. अशा प्रकारचे संगीत वाजवण्याचे माझे आयुष्यभर स्वप्न होते जे ऐकून श्रोते टाळ्या वाजवण्यास विसरून जातील,’ असे मानणारा हा कलावंत आजही मोठ्या संगीत सभांमध्ये ज्या वेळी वादन करतो त्या वेळी त्या वादनाचा आनंद घेत, श्रोते टाळ्या वाजवायला विसरतात. स्वतः निर्विचारीपणाची अवस्था अनुभवत श्रोत्यांना सर्व विसरून ध्यान-मग्न व्हायला लावणारा हा कलावंत म्हणूनच नायक म्हणता येईल... खरा ‘संतूर-नायक’!

- सतीश पाकणीकर
मोबाइल : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXFCJ
Similar Posts
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
गृहिणी-सखी-सचिव (पूर्वार्ध) सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास.
शहंशाह-ए-गज़ल गज़लसम्राट मेहदी हसन यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘रसराज’ पंडित जसराज तसं म्हटलं तर शेवटच्या श्वासापर्यंत गात होते. ८९व्या वर्षी ‘सवाई’ त गायले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी पोहोचले. मग सारं जग ‘करोना’मय झालं. तरी यांचं ऑनलाइन शिकवणं सुरूच होतं. १७ ऑगस्ट २०२०ला त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला. ‘जसराज’ नावाचं एक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language